डम्परमधून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिक त्रस्त नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जड वाहनांवर कारवाई करा; कविता दळवी यांची निवेदनाद्वारे मागणी

*प्रतिनिधी : विनायक साबळे*

कोरेगाव भीमा : प्रतिनिधी
वाघोली, लोणीकंद या परिसरात खाण क्रशर उद्योग असून भावडी-वाघोली रस्त्यासह पुणे-नगर महामार्गावर डम्परमधून खडी, डस्टची (भुकटी) वाहतूक केली जाते. वाहतूकदार क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करत असून बहुतांश डम्परवर आच्छादन नसल्यामुळे धुळीचा नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. धुळीमुळे नागरिकांना डोळ्यांच्या आजारांसह त्वचेचे आजार उद्भवत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जड वाहनांवर कडक कारवाई करावी अशी मागणी माजी उपसरपंच कविता दळवी यांच्यासह सोसायटी धारकांनी एका निवेदनाद्वारे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे केली आहे.

वाघोली, लोणीकंद या परिसरात खाणपट्टा असल्यामुळे व दिवसेंदिवस वाढत्या नागरीकरणामुळे बांधकामातही वाढ झाली आहे. बांधकामांना खडी, डस्टची मागणी वाढल्यामुळे साहजिकच जवळच असलेल्या खाणपट्ट्यामधून डम्परची वाहतूक वाढली आहे. खडी, रेती, डस्टची वाहतूक करताना बहुतांश जड वाहने आच्छादन विना भरधाव वेगाने वाहने पुणे-नगर महामार्गावर धावतात. आच्छादन नसल्यामुळे उडणाऱ्या धुळीमुळे डंपरच्या मागे असणाऱ्या दुचाकीधारकांना याचा मोठा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना लहान मुलांसह महामार्गावरून प्रवास करताना धुळीमुळे मोठा धोका पत्करावा लागत आहे. धुळीच्या अतिशुक्ष्म कणांमुळे नागरिकांना श्वसन, दमा, डोळे, त्वचा आदि आरोग्याबाबतच्य समस्या वाढल्या आहेत. आधीच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यातच जड वाहतूक धारकांकडून होत असलेल्या नियमांचे उल्लंघन यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर संबधित अधिकाऱ्यांनी थातूरमातूर कारवाई न करता कडक कारवाई करावी अशी मागणी दळवी यांनी केली आहे. कारवाई न केल्यास संबधित कार्यालयावर सोसायटी धारकांसह ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन केले जाईल अशा इशारा सुद्धा दळवी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. संबधित परिवहन अधिकारी यांना संपर्क केला असता होऊ शकला नाही.

*प्रतिक्रिया :*

संबधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जड वाहतूकदार नियमांचे उल्लंघन करून क्षमतेपेक्षा मालाची वाहतूक करता. डस्ट वाहतूक करणाऱ्या बहुतांश वाहनांवर आच्छादन नसल्यामुळे उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुचाकी धारकांना डोळ्यात जाणाऱ्या धुळीमुळे अपघाताला सामोरे जावे लागत आहे. – सुधीर दळवी (स्थानिक नागरिक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!