आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

८ नोव्हेंबर विधानपरिषद माजी उपसभापती,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वसंत डावखरे यांचा जन्मदिवस .

ठाणे

ठाणे (प्रतिनिधी-संजय कदम)
जन्म. ८ नोव्हेंबर १९४९
ठाणे जिल्ह्यातील राजकारणातला एक वजनदार नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. डावखरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक होते. ठाणे जिल्ह्यात वसंत डावखरे यांच्या शब्दाला वजन होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी राजकारणात अजातशत्रू अशी त्यांची ओळख होती. शरद पवारांप्रमाणेच दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कुटुंबीयांशीही त्यांचा स्नेह राहीला. पुण्यातील शिरूर गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वसंत डावखरे यांचं जीवन संघर्षमय राहीलं. घरची परिस्थिती बेताची असतानाही मोठ्या जिद्दीने त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन जीवनातच राजकारणाचा श्रीगणेशा करणाऱ्या वसंत डावखरे यांनी मैत्री जपून राजकीय वाटचाल केली. डावखरे १९८६मध्ये सर्वप्रथम ठाणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्यानंतर राजकारणात त्यांचं वजन वाढतच गेलं. ठाणे महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. दरम्यान, १९८७मध्ये शिवसेनेविरोधात मोट बांधून भाजपचे तीन व जनता पक्षाच्या एका नगरसेवकाच्या मदतीने डावखरे यांनी काँग्रेसकडे सत्ता खेचून आणली. सतीश प्रधान यांना महापौरपदावरून जावे लागले आणि डावखरे यांच्या गळ्यात ठाण्याच्या महापौरपदाची माळ पडली. १९८७ ते १९९३ पर्यंत ठाणे पालिकेत काँग्रेसची सत्ता होती. त्यानंतर १९९२मध्ये सर्वप्रथम डावखरे विधानपरिषदेवर निवडून आले. सलग ४ वेळा ते विधानपरिषदेवर निवडून गेले. १९९८मध्ये ते पहिल्यांदा विधानपरिषदेचे उपसभापती झाले. त्यानंतर गेल्या निवडणुकीपर्यंत त्यांनी उपसभपापतीपद भूषविले. मात्र २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी त्यांचा पराभव केला. वसंत डावखरे यांचे ४ जानेवारी २०१८ रोजी निधन झाले.
SHARE
Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचेकडे असून कोणत्याही बातमी किंवा फोटोची कॉपी करू नाही
Close
Close