सरपंच, उपसरपंचांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशिल राहावे : आ. लहू कानडे
श्रीरामपूर

सरपंच, उपसरपंचांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशिल राहावे : आ. लहू कानडे
श्रीरामपूर प्रतिनिधी- इमरान शेख
तेरा गावातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांचा सत्कार समारंभ
श्रीरामपुर : ग्रामपंचायत शंभर टक्के सरकारी कार्यालय असून सरपंच व ग्रामसेवक हे
लोकसेवक आहेत. त्यामुळे सरपंच, उपसरपंच व
सदस्यांनी जनतेच्या मुलभूत गरजा सोडवून गावाचा विकास करण्यासाठी सर्वाधिक प्रयत्नशिल राहावे, असे आवाहन श्रीरामपूर मतदारसंघाचे आमदार लहू कानडे यांनी केले.
मंगळवारी (दि.२३) टाकळीभान येथील रूख्मिणी माधव मंगल कार्यालयात श्रीरामपूर तालूक्यातील १३ गावातील ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार लहू कानडे यांच्या हस्ते १३ गावातील नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष इंद्रनाथ पाटील थोरात, काँग्रेसचे तालूकाध्यक्ष अरूण नाईक, पंचायत समिती सदस्या वंदना ताई मुरकुटे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, विष्णूपंत खंडागळे, प्रा. कार्लस साठे, काँग्रेसचे तालूका उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, सहाय्यक गटविकास अधिकारी दिघे, विस्तार अधिकारी आर. डी. अभंग, कृषि अधिकारी कडलग यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. लहू कानडे म्हणाले, जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समितीचे सभापती यांना निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. जिल्हा परिषदेचे निर्णय घेण्याचा अधिकार सिईओ यांना तर पंचायत समितीचे निर्णय घेण्याचा अधिकारी गटविकास अधिकारी यांना आहेत. मात्र ग्रामपंचायतीमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी सरपंच यांना असल्याने जास्तीत जास्त चांगले निर्णय घेवून गावाचा सर्वांगीण विकास करावा.
काँग्रेसपक्ष हा सर्वांना बरोबर घेवून चालणारा पक्ष आहे. मी देखील काँग्रेस पक्षाचा लोकप्रतिनिधी असल्याने आपण या पक्षाचे आहोत, या गटाचे आहोत, याचा विचार न करता बिनधास्तपणे गावाचे कामे घेऊन या. लोकप्रतिनिधी म्हणून आपले सर्व कामे मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही आ. कानडे यांनी दिली.
आ. कानडे पुढे म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी मास्कचा वापर करावा, शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, ग्रामपंचायतीनेही कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहनही केले.
यावेळी तालुक्यातील १३ गावातील सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक तसेच टाकळीभान येथील ग्रामस्थ बहू संख्येने उपस्थित होते. यावेळी विष्णूपंत खंडागळे यांनी आभार मानले.