
साप्ताहिक”कालतरंग” चा सन २०२२ चा राज्यस्तरीय उल्लेखनिय दिवाळी अंक म्हणून गौरव !!
जव्हार , प्रतिनिधी
वृत्तपत्र लेखक चळवळीचे अमृत महोत्सवी वर्षांचे औचित्य साधून मराठी वृत्तपत्र लेखक संघ या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या ४८ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक २०२२ चा निकाल नुकताच जाहीर झाला अन उल्लेखनीय अंक म्हणून जव्हार तालुक्यातुन प्रसिद्ध होणार्या कालतरंग या दिवाळी अंकाची निवड करण्यात आली . रविवार दि. २६ फेब्रुवारी २०२३ रोजी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन मराठी भाषा गौरव या कार्यक्रमात दादर येथील धुरु सभागृह येथे पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. ग्रंथालय चळवळीतील दिवंगत ज्येष्ठ कार्यकर्ते आणि दादर सार्वजनिक वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह दत्ता कामये यांचे स्मरणार्थ पुरस्काराने वितरण करण्यात आले. जगविख्यात न्यूरोस्पायनल सर्जन डॉ. रामाणी, सुप्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, नाटक-चित्रपट अभिनेत्री चिन्मयी सुमित, उद्योजक शंकरशेट माटे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पालघर जिल्हयातून गेल्या चार दशकापासून मोठ्या दिमाखाने आणि प्रतिकूल परिस्थितीत प्रसंगी निर्माण होऊनही सातल्याने व अखंडीत पणे प्रकाशित होणाऱ्या कालतरंग दिवाळी अंकांची उलेखनीय अंक म्हणून खास दखल घेण्यात येऊन गौरविण्यात आले. संस्थापक संपादक म्हणून कै. दयानंद मुकणे यांनी लावलेले रोपटे त्यांचे चिरंजीव संदीप आणि स्नुषा लतिका यांनी उत्तरोत्तर विकसित केले. आणि त्याचे फलित म्हणून सदर प्रसंगी कालतरंगचे संपादक संदीप मुकणे व सह संपदिका लतिका संदीप मुकणे यांचा ज्येष्ठ नेत्रशल्य चिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांनी मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. कालतरंगच्या शिरपेचात या पुरस्काराच्या माध्यमातून बहुमान प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील सन १९९१ साली ‘दर्पण’ पुरस्काराने तर १९९९ साली हार्टिक साधत तीन वेळा “कालतरंग” दिवाळी अंकाचा एकाच वर्षी गौरव करण्यात आला होता. तर रविवार दि. २६ फेब्रुवारी २०२३ रोजी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन मराठी भाषा गौरव या कार्यक्रमात मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने कालतरंग दिवाळी अंकाचा उल्लेखनीय अंक म्हणून गौरव करण्यात आला.