
अॅक्सिस बँक ठरली गिफ्ट सिटी आयएफएससीमधील आंतरराष्ट्रीय बँकिंग युनिटद्वारे विमान वित्तपुरवठा करणारी पहिली भारतीय बँक
अॅक्सिस बँक ठरली गिफ्ट सिटी आयएफएससीमधील आंतरराष्ट्रीय बँकिंग युनिटद्वारे विमान वित्तपुरवठा करणारी पहिली भारतीय बँक
‘एअर इंडिया’सोबत केला ऐतिहासिक करार; स्वदेशी विमान वित्तपुरवठा उपाययोजनांसाठी नवा मार्ग मोकळा
नागपूर, मार्च २०२५: भारतातील आघाडीच्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या अॅक्सिस बँकेने ‘गिफ्ट सिटी आयएफएससी’मधील आपल्या आंतरराष्ट्रीय बँकिंग युनिटद्वारे (आयबीयू) विमान वित्तपुरवठा व्यवहार यशस्वीपणे पूर्ण केला असून असा व्यवहार करणारी पहिली भारतीय बँक होण्याचा मान मिळवला आहे. याबाबतचा ऐतिहासिक करार ‘एआय फ्लीट सर्व्हिसेस लिमिटेड’शी (एआयएफएस) करण्यात आला. ही कंपनी ‘एअर इंडिया’ची (टाटा समूहाची पूर्ण मालकीची उपकंपनी) भाडेपट्टी सेवा शाखा आहे. या महत्वपूर्ण टप्प्यामुळे पारंपरिकपणे बहुराष्ट्रीय बँकांच्या वर्चस्वाखाली असलेल्या भारतीय विमान वित्तपुरवठा क्षेत्रात मोठी प्रगती साधली गेली आहे, तसेच गिफ्ट सिटीला विमान भाडेपट्टी आणि वित्तपुरवठ्याच्या उदयोन्मुख केंद्राच्या रूपात बळकटी मिळाली आहे.
‘अॅक्सिस बँके’ने केलेला हा करार ३४ प्रशिक्षण विमानांच्या खरेदीसाठी दीर्घकालीन कर्ज अमेरिकी डॉलरमध्ये प्रदान करण्यासंदर्भात आहे. ही विमाने महाराष्ट्रातील अमरावती येथे एअर इंडियाच्या नवीन वैमानिक प्रशिक्षण संस्थेत तैनात केली जाणार आहेत. ही सुविधा भारतातील सर्वात मोठ्या वैमानिक प्रशिक्षण केंद्रांपैकी एक ठरणार असून, देशाच्या वाढत्या विमानवाहतूक पायाभूत सुविधा विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणार आहे. या व्यवहाराला वित्तपुरवठा करून अॅक्सिस बँक ही भारतीय विमान वित्तपुरवठा क्षेत्राची फेररचना करत आहे. भारतीय विमान कंपन्यांना स्वदेशी वित्तपुरवठा उपाय उपलब्ध करून देत वैश्विक विमान वाहतूक वित्तपुरवठ्यात भारताच्या आर्थिक आत्मनिर्भरतेला ती बळकटी देत आहे.
गिफ्ट सिटी हे भारताचे विमान वित्तपुरवठा केंद्र म्हणून विकसित होत आहे. भारताच्या बँकिंग इतिहासात प्रथमच या व्यवहारात सर्व प्रमुख घटक, म्हणजे कर्जदाता, कर्जग्राही, कायदेशीर सल्लागार संस्था, सुविधा एजंट आणि सुरक्षा एजंट, हे सर्व गिफ्ट सिटीतील संस्थांचे घटक एकत्र आले आहेत. जागतिक विमान वित्तपुरवठा केंद्रांना एक रणनीतिक पर्याय म्हणून भारत सरकार ‘गिफ्ट सिटी’ला सक्रियपणे प्रोत्साहन देत आहे. या दृष्टीने अॅक्सिस बँकेने उचललेले हे पाऊल भारताच्या धोरणाच्या पूर्ततेसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.
अॅक्सिस बँकेचे डिप्टी मॅनेजिंग डायरेक्टर राजीव आनंद म्हणाले, “अॅक्सिस बँकेत आम्ही आर्थिक नवोपक्रमांच्या मर्यादा पुढे नेत भारताच्या दीर्घकालीन आर्थिक विकासाला बळकटी देण्यावर विश्वास ठेवतो. आमच्या ‘गिफ्ट सिटी आयबीयू टीम’ने तयार केलेला हा अभिनव विमान वित्तपुरवठा करार भारतात मजबूत विमान वित्तपुरवठा परिसंस्था निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. आयएफएससी परिसंस्थेतील आपल्या उपस्थितीचा लाभ घेत आमच्या गिफ्ट सिटी शाखेने स्वदेशी वित्तपुरवठा उपाययोजना देण्याची क्षमता सिद्ध केली आहे. जागतिक विमान वाहतूक क्षेत्रात भारताची भूमिका अधिक बळकट करण्याकरीता ती उपयुक्त आहे. भारताचे विमान वाहतूक क्षेत्र नवी शिखरे गाठत असताना, आम्ही आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनाला अनुसरून गतिशील आणि सानुकूलित आर्थिक उपाय पुरवण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
‘एअर इंडिया’चे चीफ फायनान्शियल ऑफिसर संजय शर्मा म्हणाले, “एअर इंडियाने ‘विहान.एआय’ या पाच वर्षांच्या परिवर्तनाच्या प्रवासाला सुरुवात केली असून, ५७० विमानांसाठी ऑर्डर दिली आहे. या विमानांच्या वित्तपुरवठ्यामध्ये गिफ्ट सिटी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये आमच्या भाडेपट्टी विभाग असलेल्या ‘एआय फ्लीट सर्व्हिसेस लि.’ (एआयएफएस) या कंपनीने एक अब्ज डॉलर्सहून अधिक मूल्याचे आठ वित्तीय भाडेपट्टी व्यवहार पूर्ण केले. यातील ३४ प्रशिक्षण विमानांच्या नुकत्याच झालेल्या व्यवहारामध्ये अॅक्सिस बॅंकेसारखी एखादी भारतीय बँक प्रथमच सहभागी झाली होती आणि हा तिच्या माध्यमातून डॉलर्समध्ये होणारा पहिलाच विमान वित्तपुरवठा व्यवहार ठरला. गिफ्ट सिटी अधिकाधिक विकसित होत असून, विमान भाडेपट्टी आणि वित्तपुरवठ्याचा एक महत्त्वाचा पर्याय म्हणून उदयास येत आहे. भारतीय विमानवाहतूक क्षेत्राने मोठी प्रगती करत असताना, गिफ्ट सिटीची वाढ होताना पाहून आनंद होत आहे.”
या व्यवहाराची प्रमुख वैशिष्ट्ये :
विमान वित्तपुरवठा करणारी पहिली भारतीय बँक – स्वदेशी विमान वित्तपुरवठ्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल.
भारताच्या विमान वित्तपुरवठा क्षमतांना बळकटी – विमान ताफा विस्ताराच्या गरजा भागवण्याचा इतर भारतीय बँकांसाठीचा मार्ग मोकळा.
वैमानिक प्रशिक्षण पायाभूत सुविधांना पाठबळ – ३४ प्रशिक्षण विमानांच्या वित्तपुरवठ्याद्वारे भारताच्या वैमानिक प्रशिक्षण क्षमतेत वाढ.
भारतीय विमान कंपन्यांसाठी स्वदेशी वित्तपुरवठ्याचा पर्याय आता उपलब्ध.
गिफ्ट सिटीच्या भूमिकेला बळकटी – भारताला जागतिक विमान वित्तपुरवठा आणि भाडेपट्टी केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याच्या दिशेने मोठा टप्पा.
विमान वित्तपुरवठ्यामध्ये ‘वन अॅक्सिस’ दृष्टिकोन – अॅक्सिस ट्रस्टीने सुविधा एजंट आणि सुरक्षा ट्रस्टीची भूमिका निभावत एकात्मिक वित्तपुरवठा उपाय पुरवला.
भारतातील विमानवाहतूक क्षेत्राला आपल्या विमानांच्या ताफ्याचे आधुनिकीकरण व विस्तार करण्यासाठी पुढील दशकात सुमारे ३० अब्ज यूएस डॉलर्स इतक्या वित्तपुरवठ्याची आवश्यकता असेल. आतापर्यंत भारतीय विमान कंपन्या बहुराष्ट्रीय बँकांवर अवलंबून होत्या, कारण आपली स्वदेशी विमान वित्तपुरवठा संरचना तुलनेने दुर्बल होती. अॅक्सिस बँकेच्या सहभागामुळे भारतीय विमान कंपन्यांना देशातील बँकिंग तज्ज्ञतेचा लाभ घेऊन आपल्या ताफा विस्ताराच्या गरजा पूर्ण करण्याचा एक नवा मार्ग उपलब्ध झाला आहे.
भारताचे विमानवाहतूक क्षेत्र वेगाने विस्तारत असताना, अॅक्सिस बँक नाविन्यपूर्ण वित्तपुरवठा उपाय उपलब्ध करून देण्यासाठी आणि भारताच्या जागतिक विमानवाहतूक क्षेत्रातील स्थानाला बळकटी देण्यासाठी कटिबद्ध आहे.