
कारगिल विजय दिवस म्हणजे भारतीय सैन्याची शौर्यगाथा – लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत
*राजु तडवी फैजपुर*
भारतीय सैन्य जगातील सर्वोत्तम सैन्यापैकी एक असून स्वातंत्र्य उत्तर काळातील चीन व पाकिस्तान सोबतच्या युद्धात भारतीय सैन्याने उच्चतम शौर्य गाजवत संपूर्ण विश्वात आपले सामर्थ्य प्रस्थापित केले आहे. यासोबत 4 मे ते 26 जुलै 1999 दरम्यान साठ दिवस चाललेल्या व 527 शूर जवानांच्या आत्मबलिदानातून मिळवलेला विजय ‘कारगिल विजय दिवस ‘ म्हणून साजरा करताना सर्वच भारतीयांचा ऊर भरून येतो. तरी प्रत्येकाने भारतीय सैन्याची विजय गाथा जाणून घेऊन जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करावा असे आवाहन लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले.
ते फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय व आगम हायस्कूल, सावदा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय छात्र सेना एककच्या वतीने आयोजित कारगिल विजय दिवसाच्या औचित्याने बोलत होते. 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगावचे समादेशक अधिकारी कर्नल प्रवीण धीमन व प्राचार्य, धनाजी नाना महाविद्यालय, फैजपुर डॉ पी आर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली एन सी सी अधिकारी लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत आणि चिफ ऑफिसर संजय महाजन यांनी त्यांच्या 35 कॅडेटस सोबत ऑनलाइन पद्धतीने वेबिनार च्या माध्यमातून कारगिल विजय दिवस साजरा केला. यावेळी लेफ्टनंट डॉ राजपूत यांनी दृकश्राव्य सादरीकरणातून कारगिल युद्धाचा इतिहास व भारतीय सैन्याची शौर्यगाथा उपस्थितांसमोर मांडली. या माध्यमातून विद्यार्थी व कडेट्स यांनी भारतीय सैन्यात अधिकारीपदावर सामील होऊन देशाची सेवा करण्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समादेशक अधिकारी कर्नल प्रवीण धीमन प्राचार्य डॉ पी आर चौधरी, सुभेदार मेजर कोमल सिंग, लेफ्ट डॉ राजेंद्र राजपूत, चीफ ऑफिसर संजय महाजन, अजित साहब, जयपाल सिंग साहब, व कडेट्स यांनी प्रयत्न केले.