
महावितरणाचा अनागोंदी कारभार; उठतो विज धारकांच्या मुळावर..
वीज पुरवठा कोमात,वीजबिल वसुली जोमात
कोरेगाव भीमा:प्रतिनिधी (विनायक साबळे)
शिरूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये महावितरण विभागाने सध्या वीजबिल वसुली सुरू केली असुन टाकळी भिमा येथील विज धारकांकडुन वीजबिल वसुल करण्यासाठी महावितरणाने चक्क दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडीत केला आहे.
टाकळी भिमा (ता.शिरूर) येथे होमाचीवाडी येथील वीजपुरवठा वीजबिल वसुलीसाठी महावितरण विभागाने दोन दिवसांपासून खंडित केला आहे.जगभर कोरोनाचे संकट असून अनेकजण कोरोनाच्या संसर्गाने बाधित झाले.यामध्ये काहींना जीव गमवावा लागला. तर एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना एकाचवेळी बाधित झाल्याने रुग्णालयात दाखल करावे लागत होते. यामध्ये अनेकांचे लाखों रुपये खर्च झाले. एकीकडे हाताला काम नाही,पिकेल ते विकले जात नाही, शेतमालाला बाजारभाव नाही, सगळे व्यवसाय काही प्रमाणात ठप्प अशातच महावितरण कडून सातत्याने थकीत बिलांसाठी मात्र तगादा लावला जात आहे. रक्कम भरल्याशिवाय वीजपुरवठा सुरळीत केला जाणार नाही असे सांगत कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून नागरीकांना उर्मट भाषा वापरली जात असल्याचे चित्र दिसत आहे.
टाकळी भिमा व परिसरातील नागरिक शेतीवर अवलंबून असुन शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन केले जाते.होमाचीवाडी येथे दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असुन संबधित विभागाने ताबडतोब वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहे.
वीजबिल भरल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करू
वीजबिले थकल्याने व वीज ग्राहक वीजबिले भरत नसल्याने वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.नागरिकांची व जनावरांची पिण्याच्या पाण्याची अडचण लक्षात घेता वीजबिले जमा केल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल असे महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडुन सांगण्यात आले.