
पोलिसांच्या तत्परतेने महिलेला गहाळ झालेले दागिने मिळाले परत..
पोलिसांच्या तत्परतेने महिलेला गहाळ झालेले दागिने मिळाले परत. (कोरेगाव भीमा आठवडे बाजारातील प्रकार)
कोरेगाव भीमा : प्रतिनिधी (विनायक साबळे)
कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एका महिलेचे दागिने बाजारात गेले असता हरवले असल्याचे तिच्या लक्षात येताच तिने कोरेगाव भीमा येथील पोलिसांकडे धाव घेत गळ्यातील दीड तोळा सोन्याचे मंगळसूत्र हरवले असल्याची तक्रार केली.
तक्रार मिळताच पोलिसांनी लगेच तत्परता दाखवत गावातील सीसीटीव्ही तपासत महिलेचे हरविलेले दागिन्यांचा शोध घेत दागिने महिलेच्या स्वाधिन केले.
आपले हरवलेले दागिने परत मिळाल्याने महिलेचा आनंद गगनात मावेनासा झाला असून गावातील नागरिकांनी पोलिसांच्या या तत्पर कार्याचे कौतुक ही केले.
कोरेगाव भीमा येथे राहणाऱ्या शोभा बाळासाहेब उंडे या १० जानेवारी रोजी बाजारात भाजीपाला घेण्यासाठी गेलेल्या असताना त्यांनी त्यांचे सोन्याचे दागिने एका पॉकेट मध्ये ठेवले होते, मात्र बाजारात गेल्यानंतर त्यांच्याकडून दागिने ठेवलेले पॉकेट हरवले असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी शेजारील पोलीस चौकीत धाव घेतली व घडलेला प्रकार कोरेगाव भीमा चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात व पोलीस नाईक कल्पेश राखोंडे यांना माहिती देत तक्रार अर्ज केला, तर यावेळी पोलीसांनी महिला बाजारात गेलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले व हरवलेले दागिन्यांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आल्याने पोलिसांनी सदर दागिने स्वतःचे ताब्यात घेत शोभा उंडे यांच्या स्वाधिन केले यावेळी उंडे यांना स्वतःचे दागिने परत मिळाल्याने मोठा आनंद झाला तर पोलिसांनी केलेल्या कार्याचे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विठ्ठल ढेरंगे व ग्रामस्थांनी कौतुक केले.