कुरकुंभ येथे पिकअप व दुचाकी चा अपघात यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार..

दौंड:- आलिम सय्यद

दौंड तालुक्यातील कुरकुंभ गावच्या हद्दीतील सेवा रस्त्यावर एका गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या (पिकअप) वाहनाने एका दुचाकीला जबर धडक दिल्याने भीषण अपघात झालाय.यामध्ये दुचाकीचालक ठार झाला असून मागे बसलेला एकजण जखमी झाला आहे. अपघातानंतर पिकअप चालक वाहन सोडून पळून गेला. हा प्रकार बुधवारी (दि. २८) रात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास घडला. संतोष वामन खाडे (वय १९ वर्ष) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. गौरव योगेश वारके असे जखमीचे नाव आहे.

संतोष कंपनीतून घरी निघाला होता. त्यावेळी हि दुर्दैवी घटना घडली. याबाबत वामन यशवंत खाडे (वय ५२, रा. शेवाळेप्लाट कुरकुंभ, ता. दौंड, मुळ रा. रासळ, पो पाली, ता. सुधागड, जि. रायगड) यांनी कुरकुंभ पोलीस मदत केंद्रात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पिकअप चालकाविरुध्द दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष खाडे हा कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील एमक्युअर फार्मास्युटीकल कंपनीत कामाला होता. त्याची सेकंड शिफ्ट असल्याने तो दुपारी अडीचच्या सुमारास घरून कामाला गेला होता. कामावरून सुट्टी झाल्यावर दुचाकीवरून तो कामातील मित्र रूपेश संजय कसबे याला फौजी हाॅटेलसमोर सोडून परत गौरव योगेश वारके याला घेऊन सेवा रस्त्याने कुरकुंभकडे निघाला होता. यादरम्यान मळदकडे भरधाव वेगात जाणाऱ्या पिकअपने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात संतोष याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेला गौरव वारके याच्या उजव्या पायाच्या गुडघ्यास, बरगडीस मार लागला आहे. या घटनेनंतर पिकअपचा अज्ञात चालक फरार झाला आहे. याबाबत पुढील तपास कुरकुंभ पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!