
मुस्लिम समाजाची या वादग्रस्त पोलीस निरीक्षका विरोधात तक्रार…
नेवासा (प्रतिनिधी)- वाळू माफियांबरोबर वादग्रस्त संभाषण व्हायरल प्रकरणातून तडका फडकी बदली होऊन पुन्हा नेवासा पोलीस स्टेशनला प्रभारी म्हणून हजर झालेले पोलीस निरीक्षकाकडून मुस्लिम विरोधी व दोन समाजामध्ये वादास कारणीभूत ठरणारी भूमिका घेतली जात असल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध तातडीने योग्य कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन नेवासा येथील मुस्लिम समाज बांधवांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. यावेळी अब्दुस सलाम, मन्सूर शेख, हाजी जुम्माखान, मौलाना इब्तेहाजुद्दीन, सलीम भाई जिम्मेदार, नगरसेवक अल्ताफ पठाण, नगरसेवक फारुक अत्तार, नगरसेवक आसिफ पठाण, इमरान दारूवाला, एजाज पटेल, जावेद भाई, आसिर पठाण, शफीक जेटली, जमीर शेख आदी उपस्थित होते.
नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची वाळू माफियांसोबत आर्थिक देवाणघेवाणचे ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने त्यांची तडका फडकी बदली करण्यात आली होती. आता पुन्हा त्यांच्याकडे आश्चर्यकारक रित्या सदर पोलीस स्टेशनचा प्रभारी पदभार देण्यात आला. पोलीस स्टेशनला रुजू झाल्यानंतर त्यांच्या कार्यपध्दतीत मोठा बदल झाला असून, ते मुस्लिम समाजाच्या विरोधात भूमिका घेत असल्याचा आरोप नेवासा येथील मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला आहे.
मुहम्मद पैगंबर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारी नुपूर शर्मा यांच्या स्मरणार्थ एका समाजकंटकाने सोशल मिडीयात पोस्ट केली होती. याबाबत तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेल्यास तक्रार न घेता, सदर समाजकंटकास बोलावून त्याचा पाहुणचार करुन त्याला परत पाठविले. दोन-तीन महिन्यांपूर्वी रामनवमीच्या मिरवणुकीवरुन शहरात वाद झाला होता. त्या वादावरून मुस्लिम समाजातील आठ ते दहा मुलांना अटक झाली आहे. न्यायालयाने त्यांना जामिनावर सोडले असून, पोलीस स्टेशनला हजेरीचे बंधन घातले आहे. ही मुले हजेरीसाठी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर, सदर प्रभारी पोलीस निरीक्षक त्यांना चार-पाच तास विनाकारण बसवून ठेवतात. तर तुम्हाला दंगल करण्यासाठी दिल्ली मर्कज येथून फोन आला असल्याचे आक्षेपार्ह वक्तव्य करुन मुस्लिम समाजाच्या भावना दुखवित आहे. नेवासा शहरातील मुस्लिम समाज दंगलीचे समर्थन करीत नसून, दिल्ली मर्कज हे जगाला शांतता व सद्भावनेचा संदेश देणारे स्थान आहे.
पंधरा दिवसापूर्वी नेवासा शहरातील उपनगरांमध्ये एका समाजाकडून वादग्रस्त फलक लावण्यात आला होता. तेव्हा मुस्लिम समाजातील काही तरुणांनी पोलीस स्टेशनला जाऊन वादग्रस्त फ्लेक्स बोर्डची तक्रार केली होती. त्यावेळी प्रभारी पोलिस निरीक्षक यांनी वादग्रस्त बोर्ड काढण्याचे आमचे नसून नगरपंचायतीचे आहे. तुम्हाला काही हरकत असेल तर तुम्ही त्यांच्या समोर तुमचा बोर्ड लावण्याचे उडवाउडवीचे उत्तर दिले. यापूर्वी नेवासा शहरात फ्लेक्स बोर्ड वरुन जातीय दंगली घडलेल्या असताना देखील या प्रकारे त्या प्रभारी पोलीस निरीक्षकाची वर्तवणुक दोन समाजात वाद पेटविणारी आहे. नेवासा बुद्रुक येथे काही महिन्यांपूर्वी नेवासा बुद्रुक येथे मुस्लिम समाजाचे पवित्र स्थान असलेल्या हजरत गैबीशाह पीर दर्गामध्ये कबरीची काही अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली. मुस्लिम समाजाने वाद न वाढविता प्रकरण संयमाने हाताळले. मात्र गुन्हा दाखल होऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटून देखील त्या गुन्ह्याचा तपास करून आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
नेवासा पोलीस स्टेशनचे वादग्रस्त प्रभारी पोलीस निरीक्षक मुस्लिम समाजाला टार्गेट करुन समाजा विरोधात भूमिका घेत आहे. भविष्यात जातीय तेढ निर्माण होऊन दंगल झाल्यास त्याला सदरचे प्रभारी पोलीस निरीक्षक जबाबदार राहणार आहेत. तरी दोन समाजामध्ये वादास कारणीभूत ठरणारी भूमिका घेणारे प्रभारी पोलीस निरीक्षक यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.