
त्रिमूर्ती फार्मा कंपनीला कारणे दाखवा नोटीस:
प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले नोटीस
दौंड : आलिम सय्यद,
दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील त्रिमूर्ती फार्मा कंपनीने विनापरवाना उत्पादन घेत प्रदूषणाचे नियम मोडीत काढल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सदरच्या कंपनीचे पाणी व वीज का बंद करू नये असे कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील अनेक कंपन्या प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसून जल व वायू प्रदूषण करत आहे. त्रिमूर्ती फार्मा कंपनीमधून मोठया प्रमाणात प्रदूषण होत असल्याची तक्रार कुरकुंभ ग्रामपंचायत सदस्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने प्रदूषण मंडळाचे अधिकाऱ्यांनी कंपनीची पाहणी केली असता सदरचा उद्योग मंडळाच्या संमती शिवाय चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच धोकादायक कचरा अधिकृतता न घेता उद्योग चालवत आहे. उत्पादन करत असताना निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करणारी प्रणाली उभारण्यात आली नसल्याने सांडपाणी बेकायदेशीर ड्रम मध्ये साठवले जात आहे. तसेच कंपनी इंधन म्हणून कोळसा न वापरता अनधिकृतरित्या लाकूडाचा वापरत असल्याचे पाहणी दरम्यान उघड झाले आहे. तसेच कच्च्या माल साठवणूक साठी कसल्याही प्रकारचे काँक्रीट जागा शेड उपलब्ध नाही. सदर कंपनीने नियमानुसार PESO जागा परवाना घेतलेला नाही. सदर कंपनीने केमिकल हजार्ड वेस्ट आदींची सदस्यत्व घेतलेला नाही. कंपनीने धोकादायक कचऱ्याच्या मानक कार्यप्रणालीचे पालन केलेले नाही तसेच दूषित पाण्याचे पुनर्वापरासाठी सुविधा उपलब्ध केलेल्या नसल्याने सदर कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारणे दाखवा नोटीस २ नोव्हेंबर रोजी बजावण्यात आली होती.
परंतु सुनावणी वेळी कंपनी प्रतिनिधीनी सांगितले की कंपनी सुरू करण्यासाठी टेस्टिंग सुरू असून कंपनी अनेक दिवसांपासून बंद असल्याचं कंपनी प्रतिनिधींकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण च्या अधिकाऱ्यांना सांगितलं परंतु सदर ची कंपनी ही अनेक दिवसांपासून सुरू असल्याचं नागरिकांमधून बोललं जातंय.