
बस मधील प्रवाशांकड़ुन १ कोटी १२ लाख रुपये लुटणाऱ्या आरोपींचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला मोठे यश..
दौंड :-आलिम सय्यद,
दौंड तालुक्यतील पाटस येथील ढमालेवस्ती जवळ पुणे सोलापूर महामार्गावरून निलंगा ते भिवंडी बसमधून प्रवास करणा-या चार प्रवाशांना अज्ञात तीन जणांनी पोलीस असल्याचे सांगत, मारहाण करीत त्यांच्याकडील रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तु अशा 1 कोटी 12 लाख 36 हजार 860 रुपयांचा ऎवज लुटला होता.
ही घटना पाटस येथील ढमाले वस्तीजवळ 3 आगस्टच्या रात्री घडली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वषेण शाखेच्या पथकाने या बोगस पोलीसांचा छडा लावला आहे. या चोरी प्रकरणात सहा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी तीन आरोपींना जेरबंद केले असून तीन आरोपींचा शोध सुरू आहे. अशी माहिती जिल्हा ग्रामिण पोलीस अधिक्षक डॅा.अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रामदास भाऊसाहेब भोसले, तुषार बबन तांबे, भरत शहाजी बांगर अशी या तीन बोगस पोलीसांची नावे आहेत. हे तिन्ही चोर शिरूर तालुक्यातील आहेत. तर उर्वरीत तीन आरोपींचा शोध सुरू आहे. या आरोपींनी लुट केलेली रक्कम उसाच्या शेतात लपून ठेवलेली होती.
पोलीसांनी स्विफ्ट कार, बुलेट मोटार सायकल, ज्युपिटर मोटार सायकल तसेच लुटीतील 1 कोटी 54 हजार 504 चा ऎवज जप्त केला आहे. दरम्यान, कुरिअर कंपनीचे पैसे घेऊन जाणारे एकूण चार प्रवाशी हे निलंगा, लातूर आणि सोलापूर बसमधून पैसे घेऊन जात होते. पैसे घेऊन जाणाऱ्यापैकी कुणीतरी या चोरांना माहिती दिल्याचा पोलिसांना संशय असून त्या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.
सध्या डिजिटल व्यवहार होत असतांना इतकी मोठी रक्कम बसने मुंबईला का घेऊन जात होते हा प्रश्न आम्ही पोलीस अधिक्षक डॅा.अभिनव देशमुख यांनी उपस्थित केला आहे. ग्रामीण पोलीस अधिक्षक डॅा.अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहीते, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट,सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, फौजदार शिवाजी ननवरे, शब्बीर पठाण, राजु मोमीण, जनार्दन शेळके, अनिल काळे, रविराज कोकरे, अनिल भुजबळ, मंगेश थिगळे, विजय कांचन, गुरू जाधव, धिरज जाधव, बाळासाहेब खडके, दगडु विरकर, काशीनाथ राजापुरे, पंधारे आदींच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना जेरबंद करण्याची कामगिरी केली आहे.