
दुचाकी चोरट्यास पोलिसांनी केले जेरबंद..
लोणीकंद पोलीस तपास पथकाची कामगिरी; तीन दुचाकी जप्त
कोरेगाव भीमा : प्रतिनिधी (विनायक साबळे)
वाघोली-केसनंद फाटा (ता. हवेली) येथून दुचाकी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तरुणास लोणीकंद पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली आहे. तपासादरम्यान त्याने तीन दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले असून चोरीच्या तीन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केसनंद फाटा चौकाजवळ पार्क केलेल्या दुचाकी जवळ एक इसम घुटमळत असून हॅन्डल हलवुन लॉक चेक करीत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार लोणीकंद पोलिसांच्या तपास पथकाने सदर ठिकाणी जाऊन संशयित इसमास सापळा रचून पकडले. त्यास नाव पत्ता विचारला असता त्याने लक्ष्मीकांत संभाजी वाघमारे (वय २८, रा. आपलेघर सोसायटी, सणसवाडी, ता. शिरुर) असे सांगितले. वाघमारे याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने वाघोलीतील रायसोनी कॉलेज येथून पल्सर, पेरणेफाटा येथून अॅक्टीवा तर सणसवाडी येथून पल्सर गाडी चोरी केल्याचे कबुल केले. पोलिसांनी तिन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत.
सदर कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त चव्हाण, पोलीस उपआयुक्त पंकज देशमुख, सहा. पोलीस आयुक्त किशोर जाधव, लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक तटकरे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी पोलीस उपनिरीक्षक सुरज किरण गोरे, सफौ मोहन वाळके, पोहवा. बाळासाहेब सकाटे, पोना अजित फरांदे, पोना कैलास साळूके, पोना विनायक साळवे, पोना प्रशांत कर्णवर, पोलीस अंमलदार समीर पिलाणे, बाळासाहेब तनपुरे, सागर शेडगे, पांडुरंग माने यांनी केली आहे.