आमोद्याच्या तरुणांचा स्तुत्य उपक्रम… महापरिनिर्वाण दिनी शाळाबाह्य परिसर स्वच्छतेचा केलेला संकल्प पूर्णत्वाकडे…

—————————————
राजु तडवी फैजपुर
आमोदे ता. यावल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी स्वच्छतेचे अभियान राबवून शाळेच्या बाहेरील परिसर स्वच्छ करून केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
फैजपूर भुसावळ या सतत रहदारीच्या रस्त्यावर येथील घनश्याम काशीराम विद्यालयाचा बाहेरील परिसर तरुणांच्या संकल्पाने स्वच्छ केला गेला असून तो कायम स्वच्छ ठेवण्याचा ध्यास आमोदा येथील काही तरुणांनी घेतला आहे . शाळेचा आतील परिसर स्वच्छ व सुंदर असताना सततच्या शाळे बाहेर शौचास बसणा-यांच्या त्रासामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालकांना नाका-तोंडावर रुमाल ठेवून शाळेत प्रवेश करावा लागतो. ग्रामपंचायत तसेच वरिष्ठांना वेळोवेळी सूचना देऊनही उपयोग होत नाही. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी पूजनासाठी आलेल्या तरुणांकडे मुख्याध्यापक श्री एस बी बोठे यांनी बाह्य परिसराची व्यथा मांडली. गुरूंच्या आज्ञेचे पालन करून काही सेवाभावी तरुणांनी स्वतः स्वच्छतेसाठी पुढाकार घेत सरस्वतीच्या मंदिराच्या दर्शनी भागात शौचास बसणाऱ्यांना आळा घालण्याचा संकल्प केला आहे. दिनांक ९-१२-२१ रोजी प्रदीप तायडे, अमर तायडे, रोहित तायडे, आदित्य तायडे,प्रशिक गौतम तायडे, अजय तायडे , प्रबुद्ध तायडे , आनोस तायडे ,
प्रशिक तायडे , गणेश वाघ यांनी शाळेत येऊन शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता करून दर्शनी भागावर शौचास बसणार्‍यासाठी कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचनाही ठळक शब्दात लिहिण्यात आली. विशेष म्हणजे या मुलांनी रात्रीची गस्त सुध्दा सुरू करून शौचास बसणाऱ्यावर नजर ठेवली आहे. शाळाबाह्य परिसरात अस्वच्छता पसरविणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा असे मुख्याध्यापक यांनी सूचित केले आहे. महापरीनिर्वाण दिनी मुख्याध्यापक यांनी तरुणांना अभ्यासिका चालविण्याचे ही आवाहन करून त्यासाठी लागणाऱ्या पुस्तकांची मदत करण्याचे आश्वासन दिले. परिसर स्वच्छता व अभ्यासिका हे उपक्रम प्रयत्नपूर्वक राबविले गेल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ती खरी श्रद्धांजली ठरेल असे मत याप्रसंगी मुख्याध्यापक एस.बी. बोठे यांनी व्यक्त केले.
स्वच्छतेचा उपक्रम यशस्वीतेसाठी तरुणांसोबतच पर्यवेक्षक
डी. डी. सपकाळे, शिक्षक एन. सी. पाटील, जे. व्ही. वानखेडे, एल. पी. पिंपरकर, पी. एस. पाटील, आय. एन. चौधरी व शिपाई बंधू डिगंबर पाटील यांनी सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!