
‘औद्योगिक प्रशिक्षणातून प्रशिक्षणार्थ्यांनी आपला उत्कर्ष साधावा ‘..
औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोखाडा येथे पालकसभा संपन्न…
———————————————-
‘औद्योगिक प्रशिक्षणातून प्रशिक्षणार्थ्यांनी आपला उत्कर्ष साधावा ‘ इति प्राचार्य चुंबळे यांनी व्यक्त केला आपला मनोदय.
____________________________
मोखाडा, दि. २२: ‘औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण करून तरुणांनी स्वतःचा उत्कर्ष साध्य करावा’. ‘त्याकरिता दर्जेदार प्रशिक्षण कामात विद्यार्थी आणि पालक यांची भूमिका अत्यंत महत्वाची असते’, असे प्रतिपादन संस्थेचे प्राचार्य रोहन चुंबळे यांनी केले. ते औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गुरूवार, दि.२२/०९/२०२२ रोजी झालेल्या पालक सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मोखाडा नगर पंचायतचे मुख्याधिकारी अभिजित कदम, प्रशासकीय अधिकारी आदित्य भुतकर, सेवानिवृत्त निदेशक कर्मचारी तथा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चुंबळे, गटनिदेशक एच. एल. मांझे तसेच ग्रामीण भागातील ज्येष्ठ पत्रकार हनीफभाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, आदिवासी बहुल भागातील मोखाडा आय.टी.आय. मूल्यांकनात राज्यातील प्रथम पाच संस्थांमध्ये आहे. त्यामुळे या संस्थेत दर्जेदार प्रशिक्षण दिले जाते. पालकांनी मुलांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि प्रशिक्षण कामात नेहमीच सकारात्मकता व अभ्यासपूर्वक सहयोग द्यावा. आपल्या तरुणांना उद्योजक होण्यासाठी पाठबळ द्यावे. प्रशिक्षण घेत असलेल्या आपल्या मुलींचा विवाह शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच करावा, असे आवाहनही प्राचार्य रोहन चुंबळे यांनी यावेळी केले.
मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी व्यवसाय शिक्षणाचे महत्व विशद केले. आपल्या अखत्यारीतील कार्यरत नगर पंचायतीमध्ये तांत्रिक कामांची मोठी गरज असल्याने यापुढे विविध तांत्रिक व्यवसायांतील प्रशिक्षित तरुणांना शिकाऊ उमेदवारी म्हणून जरूर संधी दिली जाईल.
मोखाडा येथील ज्येष्ठ पत्रकार हनीफभाई शेख यांनी पालक व शिक्षक यांच्याशी चर्चाद्वारा संपर्क, सुसंवाद साधला आणि संस्थेच्या उंचावलेल्या प्रगतीचा चढता आलेख पाहून प्राचार्य चुंबळे यांच्या सकारात्मक उर्जेचे विशेष कौतुक केले.
प्रथमच होत असलेल्या पालक सभेला पालकांची उपस्थितीं लक्षणीय होती. पालकांनी देखील प्रश्नोत्तराच्या दुसऱ्या सत्रात आपल्या विविध शंका – समस्या मांडल्या व शंकांचे निरसन करून घेतले.
निदेशक संदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. साहेबराव धनवटे यांनी सूत्रसंचालन केले. भालचंद्र राऊत यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती योगिता धनवटे, श्रीमती सोनाली गीते, घाग मॅडम, हेमंत ठाकरे, अमर ठोंबरे,अझर शेख यांनी परिश्रम घेतले।…….
प्रतिनिधी जहीर शेख सह दर्शन पाडवी जव्हार।…….