
मानवी साखळी आंदोलनाला मुरबाडकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद..
लोकनेत्याला शिस्तीचे पालन करून दिली मानवंदना
*प्रतिनिधी-संजय कदम*
लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे या मागणीसाठी, आज गुरुवार दि.१० जून २०२१ रोजी सकाळी १० वा.पासून मुरबाड तालुक्यातील आणि शहरातील सर्व बहुजन समाज बांधवांनी मानवी साखळीचे आयोजन केले होते. या मानवी साखळी आंदोलनाला मुरबाडकरांनी तसेच अनेक पक्षातील नेतेमंडळींनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार मा.श्री.किसनजी कथोरे साहेब या आंदोलनात सहभागी झाल्याने मानवी साखळीचा विस्तार वाढतच गेला. आंदोलनादरम्यान पत्रकार बांधवांसोबत संवाद साधताना आमदार साहेबांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीचे समर्थन करताना दि.बांनी स्थानिक भुमीपुत्रांसाठी दिलेल्या लढ्यांचा आवर्जून उल्लेख केला. त्यांचा त्याग,जिद्द आणि समाजबांधवाबाबत असलेले प्रेम यांच्या बळावर त्यांनी रायगड, ठाणे, मुंबई परीसरातील बहुजन समाजातील स्थानिक भुमीपुत्रांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव दिल्यास दि.बांच्या जीवनकार्याचा खर्या अर्थाने तो सन्मान ठरेल अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देणेबाबतचे निवेदन मुख्यमंत्री मा. श्री.उद्धव ठाकरे साहेबांना देण्यासाठी ते प्रशासकीय प्रतिनिधी म्हणून मुरबाड तालुका तहसिलदार साहेबांना देण्यात आले. तसेच ही मागणी मान्य न झाल्यास दि.२४ जून रोजी सिडको भवनला घेराव मोर्चा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. मानवी साखळी आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व मुरबाडकरांचे, विविध राजकीय पक्षांतील नेतेमंडळी, कार्यकर्ते आणि विशेषतः महिला आणि तरूणवर्गाचे मन:पुर्वक आभार व्यक्त करून आंदोलनांची सांगता करण्यात आली.