शिक्रापुरात महावितरणचा ग्राहकास शॉक …मीटर नसताना देखील ग्राहकाला विजेचे बिल..

 

कोरेगाव भीमा : प्रतिनिधी (विनायक साबळे)
शिक्रापूर ता. शिरुर येथे एका महिला ग्राहकाने त्यांचे विद्युत कनेक्शन बंद केल्याने विद्युत मीटर महावितरण विभागाला जमा करुन चार महिने उलटून देखील सदर ग्राहकाला पुन्हा विजेचे बिल येत असल्याने विद्युत वितरण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

शिक्रापुर येथील महाबळेश्वर नगर येथे अर्चना ज्ञानेश्वर टेमक यांनी विजेचे कनेक्शन घेतलेले होते, मात्र काही कारणास्तव त्यांनी विजेचे कनेक्शन बंद करण्याबाबत विद्युत वितरण विभागाकडे जुलै २०२१ मध्ये लेखी अर्ज केला होता मात्र विद्युत वितरण विभागाने कनेक्शन बंद केले नाही. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात आलेले वीजबिल भरून टेमक यांनी स्वतः विद्युत मीटर काढून विद्युत वितरण विभागाकडे अर्ज करुन मीटर जमा करत असल्याचे सांगत यापुढे वीजबिल येऊ नये अशी विनंती अर्ज देखील जमा केला, मात्र त्यांनंतर देखील टेमक यांना वीजबिल येणे सुरूच राहिले त्यामुळे त्यांनी चुकून बिल आले असावे असा समज झाल्याने पुन्हा बिल भरून टाकले, परंतु पुन्हा विद्युत वितरण विभागाकडे लेखी अर्ज करुन आम्ही विजेचे कनेक्शन बंद करून यापूर्वीची बिले देखील जमा केले आहे व वीज मीटर आपल्या कार्यालयाकडे जमा केलेला असल्यामुळे आम्हाला यापुढे बिल येऊ नये याबाबत लक्ष घालण्याची देखील विनंती केली मात्र तरी देखील अर्चना टेमक यांना ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचे वीज बिल येणे सुरूच राहिले आहे.

सध्या विजेची बिले ग्राहकांना मिळत असताना टेमक यांना मीटर नसताना आणि वीज कनेक्शन बंद असताना पुन्हा बिल आलेले असल्यामुळे टेमक हैराण झाले असून त्यांनी पुन्हा विद्युत वितरण विभागाकडे तक्रार करत विद्युत वितरण विभागाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मात्र विद्युत वितरण विभागाकडून घडत असलेल्या अशा गैरकारभारामुळे विद्युत वितरण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येत आहे.

*टेमक यांचे प्रतिनिधी आमच्या कार्यालयात आलेले होते, त्यांचे समोर आमच्या सिस्टीम मधून त्यांचे कनेक्शन कायमस्वरूपी बंद केलेले आहे, त्यामुळे यापुढे त्यांना बिल येणार नाही … अशोक पाटील , सहाय्यक अभियंता.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!