
फैजपूर नाभिक युवा संघटनेतर्फे आघाडी सरकारचा जाहीर निषेध..
—————————————-
फैजपुर ( प्रतिनिधी )
महाराष्ट्रात दि ०४/०४/२०२१ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ व सर्व पक्षीय नेत्यांना सोबत घेऊन झालेल्या बैठकीत लॉकडाउन ऐवजी कडक निर्बध जाहीर करीत असताना ” सलून दुकाने ( केश कर्तनालये ) बंद ठेवावी ” या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाचा आम्ही फैजपूर शहरातील व समस्त महाराष्ट्रातील नाभिक समाज जाहीर निषेध करीत आहोत. अश्या आशयाचे निवेदन फैजपूर उपविभागीय अधिकारी तथा प्रांतधिकारी मा. कडलग साहेब व नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा. चव्हाण साहेब यांना समाजाचे प्रतिनिधी बंटी आंबेकर यांच्यामार्फत देण्यात आले.
हातावर पोट असलेला नाभिक समाज आहे व केशकर्तन हा परंपरागत व्यवसाय असून या कारणामुळे पूर्ण सलून व्यवसाय हा अडचणीत सापडलेला आहे. सद्यस्थितीत कोरोनाच्या भीतीमुळे ग्राहकांनी सलून दुकानांकडे पाठ फिरवल्यामुळे गेले वर्षभर आमचा समाज पुरता हवालदिल झाला आहे, यामुळे समस्त सलून व्यवसायिकांना (नाभिक समाजास ) दुकान भाडे, घर भाडे, लाईटबिल, पाल्यांचे शिक्षण, दैनंदिन अन्न धान्याबाबत आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या आलेल्या आर्थिक समस्यांना कंटाळून मागील काही काळात महाराष्ट्रातील विविध भागातील सलून व्यवसायिकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपविले. अवघ्या महाराष्ट्रातील सलून व्यावसायिकांनी (नाभिक समाजाने) महाराष्ट्र शासनाकडे वारंवार आर्थिक मदतीचे निवेदन देऊनही शासनाने त्याची दखल अद्यापपावेतो घेतलेली नाही. फक्त आश्वासनांची पाने सलून व्यवसायिकांच्या ( नाभिक समाजाच्या ) तोंडाला पुसली. आजवर फक्त महाराष्ट्र शासनाने उठ सुठ सलून व्यवसाय बंद असेच आदेश काढलेले आहे. सलून व्यवसायिक (नाभिक समाज ) हे माणूस नाहीत का किंवा त्यांच्या जीवाची व परिवाराची त्यांना काळजी नाही का ? महाराष्ट्र शासनाने एकदा तरी सिद्ध करावे कि सलून व्यवसायिकांमुळे कोरोनाचा फैलाव होतो ते ? का सलून व्यवसायिकांना ( नाभिक समाजास ) कोरोनाचा हॉटस्पॉट ठरविले जाते ? बँकांमध्ये, बाजार पेठेत, अन्य व्यवसायिक दुकानांमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव होत नाही का ? सलून व्यवसायिकांनाच बळींचा बकरा का बनविले जाते ? याबाबत महाराष्ट्र शासन उत्तर देण्यासाठी बाधील आहे. नाभिक समाज हा गरीब आहे पण भिक मागणारा समाज नाही तो स्वबळावर जगणारा समाज आहे, समाजास शासनाने कुठलीही मदत नाही केली तरी चालेल पण त्यांचे तोंडची भाकरी तरी हिसकावू नका. महाराष्ट्र शासनास इतकीच विनंती आहे कि सलून व्यवसायास आपणाकडून परवानगी मिळावी. ही विनंती आहे. ज्या प्रमाणे आधी जसे सलून व्यवसायिक ( नाभिक समाज) शासकिय निकषाचे पालन करून व्यवसाय करत होता तसाच आता सुद्धा करील. व होणाऱ्या बेरोजगारीची झळ अंशतः कमी होईल.
शासनाने परवानगी न दिल्यास समस्त सलून व्यवसायिक ( नाभिक समाज ) हा रस्त्यावर उतरेल, व येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इत्यादी निवडणुकांवर पूर्ण महाराष्ट्रातून बहिष्कार करेल. रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाईल. त्याचप्रमाणे या लाखो सलून व्यावसायिकांच्या पोटावर पाय देणाऱ्या आघाडी सरकारचा फैजपूर नाभिक युवा संघ जाहीर निषेध करीत आहे. त्याच प्रमाणे शासनाचे डोळे उघडावेत म्हणून परिस्थती नसतांना सुद्धा फैजपूर शहरातील समस्त नाभिक बांधवांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार, व आरोग्य मंत्री मा. श्री. राजेशजी टोपे यांना वैयक्तिक साध्या पोष्टाने पत्र पाठवून निषेध नोंदवून मंत्री महोदयांना पत्र पाठवा असे अनोखे आंदोलन पूर्णत्वास नेले.
यावेळी फैजपूर येथील नाभिक समाजाचे अध्यक्ष बंटी आंबेकर, सचिव प्रमोद जगताप, मयूर बोरसे, गोलू हातकर, अनिल मानकरे, वहिद सलमानी, साजिद सलमानी, सागर जाधव, शुभम सोनवणे इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.