
Omicron चे युरोप मध्ये आले वादळ…!
मंगळवारी युरोपात जागातिक आरोग्य संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ओमिक्रॉनमुळे संपूर्ण युरोप खंडात कोरोना केसेसमध्ये लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे सरकारला सज्ज राहण्यास सांगितले आहे. अनेक देशांतमध्ये ओमिक्रॉनचा कहर सुरू आहे. डब्ल्यूएचओचे स्थानिक संचालक डॉ. हँस क्लूज यांनी व्हिएन्ना येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘आपण अजून एक वादळ जवळ येताना पाहू शकतो.’
डॉ. क्लूज नक्की काय म्हणाले?
डॉ. क्लूज म्हणाले की, ‘काहीच आठवड्यात ओमिक्रॉनचा युरोप खंडात आणि इतर देशांमध्ये हाहाकार होणार आहे. ज्यामुळे वाईट परिस्थितीतून चाललेल्या आरोग्य व्यवस्थेवर आणखीन परिणाम होईल. ओमिक्रॉन डब्ल्यूएचओच्या युरोप खंडातील कमीत कमी ३८ सदस्य देशांमध्ये आढळला आहे. ब्रिटन, डेनमार्क, पोर्तुगााल येथे पहिल्यापासून ओमिक्रॉनने हाहाकार माजवला आहे.’
‘गेल्या आठवड्यात युरोपियन युनियनमध्ये कोरोनामुळे २७ हजार जणांचा मृत्यू झाला आणि २८ लाखांहून अधिक केसेसची नोंद झाली. या केसेसमध्ये सर्व प्रकारच्या व्हेरिएंटमुळे संक्रमित झालेले रुग्ण आहेत. पण ही संख्या गेल्या वर्षीच्या काळाच्या तुलनेत ४० टक्के अधिक आहे. कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येमुळे अधिक लोकांना रुग्णालयात दाखल केले जाऊ शकते,’ असे डॉ. क्लूज म्हणाले.
डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस एडनॉम म्हणाले की, ‘येणारे कार्यक्रम रद्द करणे हे जीव धोक्यात घालण्यापेक्षा केव्हाही चांगले आहे. आता कठोर निर्णय घ्यावे लागतील. याचा अर्थ काही कार्यक्रम असतील ते रद्द करावे किंवा कार्यक्रमाची तारीख पुढे ढकलावी. ओमिक्रॉन हा डेल्टाच्या तुलनेत अधिक वेगाने पसरणारा असल्याचे ठोस पुरावे आपल्याकडे आहेत.’
दरम्यान संपूर्ण जग ख्रिसमस आणि नवीन वर्षाची तयारी करण्यात मग्न आहेत. परंतु गेल्या महिन्यापासून युरोपच्या काही देश कोरोनाच्या लाटेशी झुंज देत आहेत.