
आरोहन मार्फत मोखाड्यात शेती व शेतीपूरक व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
मोखाडा तालुक्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आरोहन सामाजिक संस्थेच्या मार्फत प्रयत्न केले जात असून .
यासाठी शेतकऱ्यांना फळझाडे लागवड, फुलशेती, दुबार शेती यासाठी सहकार्य केले जात आहे. याच धर्तीवर शेतकऱ्यांना शेतीचे नवीन तंत्रज्ञान, कीडव्यवस्थापन, पिकपोषण, या विषयावर माहीती मिळण्यासाठी मोखाड्यातील गावांमधून प्रत्येक महिन्यात प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जात असल्याचे प्रकल्प अधिकारी गणेश सरोदे यांनी सांगितले.
गेल्या आठवड्याभरात मोखाड्यात फळबागा आणि त्यातील आव्हाने, भात, नागली पीकातील किडव्यवस्थापन या वेगवेगळ्या विषयांवर गोमघर व कोशिमशेत या ठिकाणी आरोहन व कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल यांच्या संयुक्त विद्यमाने १६ सप्टेंबर आणि २० सप्टेंबर रोजी हे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षणा दरम्यान के.व्ही.के कोसबाड येथील श्री. भरत कुशारे आणि श्री. उत्तम सहाणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यामध्ये सुरवातीला आंबा-काजू लागवडीमध्ये खतव्यवस्थापन, खते देण्याच्या पद्धती, किडरोग नियंत्रण, फुलोरा व्यवस्थापन, सेंद्रिय खते, पाणी नियोजन याबद्दल मार्गदर्शन केले.
तसेच भातावर येणाऱ्या महत्वाच्या किडी व रोग कसे ओळखावे, त्यांचे योग्य पद्धतीने नियंत्रण कसे करावे याविषयी माहिती दिली. भातपिकामधील सुधारीत लागवड तंत्रज्ञान व त्या अनुषंगाने कमी खर्चात उत्पादकता कशी वाढवता येईल याबद्दल चर्चा झाली.
सद्यस्थितीत भात पिकात करावयाच्या व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित शेतकऱ्यांना भात पिकात किडनियंत्रणासाठी कामगंध सापळे वाटप केले.
या प्रशिक्षणात कोशिमशेत, डोल्हारा, आडोशी, गोमघर ग्रामपंचायत मधून १२५ हुन अधिक शेतकरी उपस्थित होते.
तसेच शेतीबरोबरच इतरही हंगामी छोटे व्यवसायांचे पर्याय येथील लोकांना करता यावे यादृष्टीने तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र मुंबई, के.व्ही.के कोसबाड व आरोहन यांच्या संयुक्त विद्यमाने मोखाड्यातील मत्स्यपालक शेतकऱ्यांसाठी २१ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर दरम्यान तीन दिवसीय मत्स्यशेती व्यवसायावर प्रशिक्षण वर्ग आयोजित केले होते.
या तीन दिवसीय प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी के.व्ही.के कोसबाड येथील श्रीमती.रुपाली देशमुख, आरोहन प्रकल्प व्यवस्थापक श्री. नितेश मुकणे, तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे डॉ.शार्दुल गांगड, डॉ. प्रविण सपकाळे, श्री.रविंद्र बोंद्रे आदि उपस्थित होते.
या प्रशिक्षणामध्ये मोखाड्यातील २५ मत्स्यपालन करण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यादरम्यान तारापोरवाला संशोधन केंद्राचे डॉ.शार्दुल गांगड, डॉ. प्रविण सपकाळे, श्री.रविंद्र बोंद्रे या तज्ञं व्यक्तींनी गोड्या पाण्यातील मत्स्यपालन आणि संधी या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले.
यादरम्यान गोड्या पाण्यातील मत्स्य शेती व त्यापुढील आव्हान, माशांच्या जाती, मत्स्य बीज, मत्स्य शेती प्रकार, माशांचे आजार, जागेची निवड, मत्स्य शेतीचे प्रमुख घटक, तलावांची मशागत, बाजारपेठ व विक्री या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षणादरम्यान प्रात्यक्षिक व माहिती द्वारे सखोल मार्गदर्शन केले. तिसऱ्या दिवशी प्रशिक्षणाच्या समारोपा दरम्यान श्री. अमित नारकर (मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोहन) यांनी संशोधन केंद्राचे या त्सुत्य उपक्रमाबद्दल अभिनंदन करून भविष्यात देखील मोखाड्यातील वंचित घटकांना उपजीवीकेचा शाश्वत स्रोत निर्माण करण्यासाठी संशोधन केंद्राकडून सहाकार्य करण्याची मागणी केली.
मत्स्य शेतीबरोबरच भविष्यात स्थानिक माशांपासून प्रक्रिया करुन त्याची साठवणूक व विक्री व्यवस्थेचे सक्षम जाळे निर्माण कसे करता यासाठी आरोहन प्रयत्नशील असून त्याकार्यात तारापोरवाला संशोधन केंद्राचे सहकार्य लागणार असल्याचे प्रतिपादन केले.
डॉ.शार्दुल गांगड यांनी भविष्यात हे कार्य अजून व्यापक करण्यासाठी संशोधन केंद्राकडून पुर्ण प्रयत्न करण्यात येतील असे नमूद केले. मोखाड्यातील कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी शेतकऱ्यांना मत्स्यशेतीची माहिती पुस्तिका, चित्रफीत व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या तीन दिवसीय प्रशिक्षणासाठी आरोहन संस्थेचे कार्यकर्ते निलेश साळवे, राजाराम शिंदे, अमोल दोंदे यांनी शेतकऱ्यांना सहभागी करण्यासाठी प्रयत्न घेतलेयाच धर्तीवर जव्हार तालुक्यातील मत्स्यपालक शेतकऱ्यांसाठी २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान समाज मंदिर, पाडवीपाडा, कोरतड, जव्हार येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रतिनिधी जहीर शेख सह दर्शन पाडवी जव्हार।…….