विद्युत वाहक टॉवरसाठी संबंधित ठेकेदाराकडून खोदाईकरण करत असताना बेकायदेशीर जिलेटीनचे स्फोट…

दौंड : आलिम सय्यद

दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी लागत असणाऱ्या गिरीम येथील वन विभागाच्या हद्दीत १३२ के.व्ही. विद्युत वाहक टॉवरसाठी संबंधित ठेकेदाराकडून खोदाईकरण करत असताना बेकायदेशीर जिलेटीनचे स्फोट करत असून तालुका वन अधिकारी कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत.
पाटस येथील खाजगी कंपनीसाठी कुरकुंभ एम आयडीसी येथील विद्युत केंद्रातून १३२ के.व्ही. वीज टॉवर व तारांचे काम जोरात चालू आहे. संबंधित खाजगी शेतजमीन मालकांना मोबदला देऊन टॉवरचे काम पूर्ण केले जात आहे. पण गिरीम येथील वन विभाग हद्दीत टॉवरच्या खोदाईसाठी व तारांचे काम करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने वन विभागाची परवानगी घेतली आहे. पण संबंधित ठेकेदाराला टॉवरची खोदाईसाठी जिलेटीनचे स्फोट करण्याची परवानगी नसताना संबंधित ठेकेदाराने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठया प्रमाणात स्फोट करत आहे. महिंद्रा कंपनीच्या दोन ट्रॅक्टरच्या (एम.एच.१२डब्ल्यू.७४५६) तर एक ट्रॅक्टर क्रमांक नसलेल्या च्या साहाय्याने जिलेटीनसाठी खड्डे घेऊन स्फोट करत आहेत. यामुळे वन विभागाच्या हद्दीतील असणाऱ्या वन्यजीव प्राण्यांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. अचानक होत असलेल्या स्फोटामुळे अनेक वन्यजीव वन विभागाच्या परिसरातून लोकवस्तीकडे धावपळ करत आहे.
यावेळी विद्युत टॉवरला वन विभागाची परवानगी मिळाली आहे. पण खोदाईकरण करत असताना स्फोट करण्याची परवानगी दिली नाही असे वन विभागातील एका कर्मचाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले आहे. याबाबत तालुका वन अधिकारी सचिन रघतवान यांनी कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत महत्त्वाची बैठक चालू असल्याचे सांगितले. यामुळे तालुका वन अधिकाऱ्यांचे आणि संबंधित ठेकेदाराचे आर्थिक संबंधित असल्याची चर्चा परिसरात जोमात चालू आहे. दरम्यान, वन विभागात टॉवरच्या खोदाईसाठी जिलेटीनचे स्फोट करण्याची परवानगी असल्याची बतावणी संबंधित ठेकेदार करत आहे.

 

केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा विभागामार्फत स्फोटकांची साठवून व स्फोट करण्याचे असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे परवाने दिले जातात. यावेळी संबंधित विभागाकडून एकाच ट्रॅक्टर वापरासाठी परवाना दिला जातो. पण संबंधित परवानाधारक चार ते पाच ठिकाणी जिलेटीनच्या स्फोटासाठी सात ते आठ ट्रॅक्टरचा बेकायदेशीर वापर करत आहे. यावेळी जिलेटीनच्या तपासणीसाठी तालुका व जिल्हा स्थळावर शासकीय अधिकारी कार्यरत नसल्याने या बेकायदेशीर स्फोटांना खतपाणी
मिळत आहे. संबंधित जिलेटीनच्या स्फोटका संदर्भातील नियम धाब्यावर बसवताना सर्रास आढळून येत आहेत. जिलेटीनच्या कांड्याची विक्री करत असताना विक्रेता व परवानाधारकांना यांना आवक जावकची नोंद वहीत ठेवणे बंधनकारक असताना या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जात नसल्याचे दिसून येत आहे. स्फोटके विक्रेत्याकडून मुदतबाह्य परवाना धारकांना व ओळखीवर जिलेटीनच्या कांड्याची विक्री करत असल्याचे आरोप ग्रामस्थ करत आहेत. विनापरवाना धारक व शॉर्ट फायर परवानाधारक जिलेटीनच्या कांड्याची बेकायदेशीर साठवून करून संबंधित शासकीय विभागाच्या डोळ्यात धूर टाकण्याचा प्रकार सर्रास घडत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!