शिष्याची आदर्श वागणूक हीच खरी गुरूपूजा-महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज

राजु तडवी फैजपुर

गुरुभक्ती करतांना कोणत्याही गोष्टीची औपचारिकता नको. गुरू-शिष्याच्या नात्यात केवळ फुल, हार, दक्षिणा या बाबींची आवश्यकता नसून गुरु तत्वाचे पालन आचरण करणे हीच खरी गुरूपूजा असते असे महत्वपूर्ण आशीर्वचन येथील सतपंथ संस्थानचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. राम रायाला आपल्या झोपडीपर्यंत खेचून आणण्यासाठी शबरी भिल्लीनची भक्ती, श्रद्धा, विश्वास याच बाबी कारणीभूत ठरल्या. तिच्याजवळ फुल, हार, दक्षिणा या कोणत्याही गोष्टी नव्हत्या. अशीच आपली गुरु विषयी श्रद्धा व वागणूक पाहिजे. मी माझे गुरु जगन्नाथ महाराजांशी अशाच प्रकारे वागलो आणि त्यांचा आशीर्वाद म्हणून आज हे वैभव आपल्याला बघावयास मिळत आहे. गुरूंना दुःख होईल असे न वागता आपण सर्वांनी त्यांना आवडेल अशी असिम भक्ती करावी व आपले जीवन धन्य करावे असे गुरुपौर्णिमेनिमित्त महाराजांनी सांगितले.
कोरोना काळ असल्याने शासनाच्या नियमाचे पालन करून सकाळी येथील सतपंथ मंदिरात घटपूजा झाली आणि गुरु पादुका पूजन करण्यात आले. तदनंतर संजीव किसन महाजन यांनी सपत्नीक महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराजांचे पाद्यपूजन केले.
गुरुपौर्णिमेनिमित्त दिनांक 21 व 22 जुलै रोजी सायंकाळी आठ ते नऊ यादरम्यान ‘भाव सत्संग’ हा ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला साधारण आठ ते दहा हजार भक्तगण जगभरातून लाईव्ह होते. त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!