
अभ्यासाची तळमळ व योग्य मार्गदर्शनामुळे प्रतीकने घातली आभाळाला गवसणी..
कोरेगाव भीमा/ प्रतिनिधी(विनायक साबळे)
रोज आठ तास अभ्यास..अवांतर वाचन,जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रतीक धुमाळ यांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करत आय ए एस पदावर नाव कोरले आहे.पिंपळे खालसा येथील छोट्या खेडेगावातून उच्च पदापर्यंत भरारी घेणारे चार अधिकारी गावातून निर्माण झाल्याने गावाने वेगळचं “पिंपळे पॅटर्न” तयार केला असल्याचा चर्चा पुणे जिल्ह्यात होत आहे.
प्रतीक धुमाळ यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते सातवी पर्यंत त्यानंतर माध्यमिक विद्यालयात आठवी ते दहावी पर्यंत झाले.उच्च माध्यमिक शिक्षण पुणे येथे झाले.
लहापणापासूनच प्रतीक हे अभ्यासात हुशार होते.त्यामुळे त्यांनी संगणक शास्त्रात त्यांनी बी टेक पर्यंतचे शिक्षण घेतले.त्यानंतर एक वर्ष ओरॅकल या खासगी कंपनीत नोकरी ही केली मात्र नोकरी करत असताना सामाजिक भान जागृत ठेवून समाज व्यवस्था बदलण्यासाठी प्रशासकीय सेवेत गेलेच पाहिजे असा मनोमन निश्चय केला.एकदा अभ्यासाची प्राथमिक तयारी करून परीक्षा ही दिली मात्र त्यात यश आले नाही.
त्यानंतर पूर्णवेळ अभ्यासात झोकून देऊन यश मिळवायचे हेच ध्येय ठेवून ते पुन्हा कामाला लागले. सन २०१९ पासून स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सुरुवात केली.वेळोवेळी गावचे डीसीपी रमेश धुमाळ, आयपीएस अधिकारी नचिकेत शेळके, आय आर एस अधिकारी श्रीधर धुमाळ यांचे मार्गदर्शन मिळाले.
अभ्यास करत असताना इंटरनेट, ट्विटर, सोशल मीडिया याचा प्रभावी वापर करून माहिती मिळविली.तसेच वर्तमानपत्रे यांचेही सतत अवांतर वाचन सुरू ठेवले.सलग आठ ते दहा तास अभ्यास केला.या मुळेच यशाच्या जवळ जाण्याचा मार्ग सुकर झाला.अन् नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत प्रतीक यांनी आय ए एस पदाला गवसणी घातली असून देशात १८३ वा क्रमांक पटकावला आहे.त्यांचे या यशाबद्दल मोठे कौतुक होत आहे.
प्रतीक यांच्या आई ललिता व वडील अशोक हे प्राथमिक शिक्षक असून त्यांची बहिण सायली या वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत आहेत.
ग्रामीण अथवा मराठी माध्यमातून शिकल्याचा तसेच ग्रामीण भागातून आल्याचा यश मिळविण्यात अडसर ठरला नाही कारण ते सांगतात,की आजकाल सध्याचे जग हे इंटरनेट चे महिती तंत्रज्ञान हे शहरापासून खेड्यांपर्यंत पोहोचले आहे.त्यामुळे ग्रामीण शहरी भेदभाव हा कमी होत आहे.मराठी माध्यमाचा मला यश मिळवतना फायदा झाला.त्याचबरोबर मराठी इंग्रजी हा भेद यशात नसतो तर तुमची आंतरिक इच्छा अभ्यासातील तळमळ,धडपड व अभ्यासातील सातत्य या गोष्टी हि यशासाठी महत्वाच्या ठरतात.
या क्षेत्रात स्पर्धा परीक्षेच्या तयारी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी सल्ला दिला की,या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपण ज्या क्षेत्रात पदवी घेतली आहे.त्यामध्ये ही उत्तुंग कामगिरी करणेसाठी कार्यरत रहा, व दुर्दैवाने स्पर्धा परीक्षेत यशस्वी होता आले नाही तर करिअरचा दुसरा पर्याय ही तयार ठेवावा असे त्यांनी आवर्जून सांगितले.
*_शिरूर तालुक्याचा असाही पिंपळे पॅटर्न…_*
शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा हे अगदी छोटेसे खेडेगाव.मात्र गावात प्राथमिक शिक्षण देतानाच विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो.पाय भक्कम केल्यानंतर अधिकारी घडविण्यासाठी प्रयत्न होत असल्याने तसेच सध्या तीन अधिकारी राज्याच्या विविध विभागात उच्च पदावर कार्यरत आहेत.तसेच पोलिस खात्यात ही अनेक चांगले काम करत आहेत.गावात पोषक वातावरण निर्माण होत असल्याने शिष्यवृत्ती परीक्षेत ही विद्यार्थी घवघवीत यश मिळवत आहेत.खरे अधिकारी जिल्हा परिषदेच्या शाळेत घडत असून पिंपळे खालसा गावाने नवा पॅटर्न निर्माण केला आहे.