
शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं गोडकौतुक..
कोरेगाव भीमा (प्रतिनिधी: विनायक साबळे) : बैलपोळा म्हटल की शेतकऱ्याचा आवडता सण,यादिवशी वर्षभर ज्याने आपल्या काळया आईची सेवा केली त्याचा पूजेच्या मानाचा दिवस. आणि याच दिवशी शिरूर तालुक्यातील डींग्रजवाडी येथे शेतकरी बांधवांनी आपल्या बैलांची सवाद्य मिरवणूक काढत बैलपोळा साजरा केला. कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा…यांत्रिकरणाच्या युगात शेतीतला बैलांचा सहभाग कमी झालाय…तरीही बळीराजाच्या जीवनात त्यांच स्थान कायम आहे… शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं गोडकौतुक करण्यासाठीच हा सण साजरा करण्यात आला…
तुझ्या अपार कष्टाने,
बहरले सारी भुई…
एका दिवसाच्या पूजेने,
होऊ कसा उतराई..!!!
पोळ्याचे दोन दिवस बैलांसाठी विश्रांतीचे असतात.त्यांना न्हाऊ खाऊ घालून त्यांची रंगरंगोटी करण्यात आली….पुरणपोळी सारखा गोडधोड जेवणाचा नेवैद्य त्यांना दिला गेला. त्यानंतर वाजत-गाजत काही ठराविक बैलांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.तर अनेकांनी घरीच बैलपूजा केली.
भाद्रपद महिन्यात अमावस्येला महाराष्ट्रात सर्जा- राजाचा सण हा बैलपोळा म्हणून साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या कष्टाचे आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
कोरोनाचे सावट तसेच पावसाचा लहरीपणा त्यामुळे पिकांना कवडीमोल भाव मिळत असला तरीदेखील आपल्या शेतात राबराब राबणारा सर्जा-राजाचा पोळा सण हा शिरूर तालुक्यातील डींग्रजवाडी येथील शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केल्याचे चित्र दिसले. यावेळी प्रगतीशील शेतकरी श्री.किसनराव जयवंतराव गव्हाणे,दामोदर देवराम गव्हाणे,श्री.शिवाजी रामचंद्र गव्हाणे, छबुराव विठोबा गव्हाणे, बाळासाहेब बाबुराव गव्हाणे,गोपीनाथ रामचंद्र गव्हाणे यांच्या बैल जोड्या मंदिरा मध्य पुजे साठी आल्या होत्या. त्यावेळी विद्यमान कार्यक्षम ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रसादशेठ शांताराम गव्हाणे,माजी उपसरपंच बाप्पुसाहेब मल्हारी गव्हाणेसामाजिक कार्यक्रते श्री.वैभव छबुराव गव्हाणे,श्री.निलेश शिवाजी गव्हाणे डिंग्रजवाडी बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष श्री.सुरेशबापु गव्हाणे श्री.प्रकाश फक्कड गव्हाणे श्री रामहरी संपत गव्हाणे,संभाजी गव्हाणे, यांसह गावातील बळीराजाने आपल्या सर्जा-राजा ला पोळा सणानिमित्त सजावट केली तसेच शेतकरी महिलेने आपल्या बैलांना नैवेद्य दाखवत औक्षण करत आपल्या सर्जा राजाला बद्दल कृतज्ञता व्यक्त करत हा पोळा सण साजरा केला.
बैलपोळा म्हटले की, पंधरा ते वीस दिवसांपासून तयारी सुरू व्हायची. बैलांना सजविण्यासाठी लागणारे बहुतांश साहित्य दोऱ्यापासून घरीच तयार केले जायचे. बैलपोळा सणाच्या पार्श्वभूमीवर बैलांना कामामधून उसंत दिली जायची. नव्हे बैलांप्रती असलेला आदर व्यक्त केला जायचा. आज बैलपोळा सण साजरा केला जातो; परंतु बैलगाडा शर्यतीवर असलेल्या बंदीमुळे बैलपोळा सणामध्ये असलेला उत्साह आणि त्या सणाची चालणारी धामधूम आज कुठेतरी हरवली असल्याची खंत ग्रामपंचायत सदस्य प्रसाद गव्हाणे यांनी व्यक्त केली.
पोळ्याच्या दिवशी आम्ही सकाळीच बैल धुण्यासाठी पाण्यात घेऊन जायचो. बैलांसाठी घरीच गोंडे तयार करणे, कासरा तयार करणे अशी कामे केली जायची. पोळ्याच्या दिवशी गावातील बैलांची भव्य मिरवणूक काढली जायची. बैलांची मानाची पूजा व्हायची. आमच्या लहानपणी बैलपोळ्याचा उत्साह वेगळाच होता.
केरबा ज्ञानोबा गव्हाणे (शेतकरी)
वीस वर्षांपूर्वी आमच्या काळात पोळा म्हणजे मोठा उत्सव असायचा. त्याची तयारी अगोदरच पंधरा दिवसांपासून चालायची. तागापासून सूत (दोर) तयार करणे आदी कामे आम्ही आवर्जून करायचो. बैलांना सजविणे असो किंवा त्यांची मिरवणूक काढणे असो त्याचा आनंद हा वेगळाच होता.
बाबाजी आबाजी गव्हाणे (शेतकरी)
आमच्या लहानपणी पोळा सण म्हणजे आनंदाचा क्षण आसायचा. मोठ्या आदराने गावातील लोकांना जेवणासाठी बोलावले जायचे. पोळा सणाची तयारी आठवडाभर अगोदर केली जायची. बैलाचा साज गोंडे, घागरमाळा, वेसणी आदी घरीच तयार केले जात होते. पळसाच्या मुळ्यापासून गोंडे बनवले जात होते. बैलांना तीन ते चार दिवस कामात उसंत दिली जात असे.
बाप्पुसाहेब मल्हारी गव्हाणे (माजी उपसरपंच)
आमच्या लहानपणी पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जायचा. लहान मुलांपासून ज्येष्ठ मंडळीही या सणात उत्साहाने सहभागी व्हायचे. गावातून बैलांची वाजत-गाजत मिरवणूक निघायची. बैलांच्या मिरवणुका पाहण्यासाठी मोठी गर्दी व्हायची.
– बाळासाहेब नाबगे (शेतकरी)
आमच्या लहानपणी साजरा होणारा बैलपोळा आणि आजचा बैलपोळा या सणाला साजरे करण्यात बदल झाले आहेत. आधुनिकीकरणात बैलांची संख्या कमी झाली. सजावटीचे आयते साहित्य मिळू लागले आहे. त्यामुळे आज केवळ पोळ्याच्या दिवशीच बैलपोळा सणाचा आनंद साजरा होतो.
– दत्तात्रय भाऊसाहेब गव्हाणे (प्रदेशाध्यक्ष स्वराज्य राष्ट्र निर्माण सेना)