
ऐन दिवाळीत कोरेगाव भीमातील स्ट्रीट लाईट बंद, नागरिकांची होतेय गैरसोय
कोरेगाव भीमा: प्रतिनिधी(विनायक साबळे)
एकीकडे दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक इमारत, घर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघत असताना शिरूर तालुक्यातील आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या कोरेगाव भीमा गावातील स्ट्रीट लाईट मागील अनेक महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून लाखो रुपयांचा महसूल गोळा होत असताना देखील ग्रामपंचायत च्या ढिसाळ व काम चुकार कामाचा फटका या भागातील नागरिकांना व वाटसरूंना बसत आहे.
मोठ्या थाटामाटात कोरेगाव भीमातून जाणाऱ्या पुणे नगर रोडवर लाखो रुपये खर्च करून स्ट्रीट लाईट व हायमस्ट पोल बसविण्यात आले. सुरुवातीचे काही दिवस सर्वच्या सर्व लाईट कार्यन्वित होत्या. परंतु काही दिवसांपासून एका मागे एक स्ट्रीट लाईट बंद पडत असल्याने रात्रीच्या वेळी महामार्गाच्या लगतच्या भागात मोठा अंधार पडत असून हायमस्ट पोल वरील लाईट सोडल्यातर फक्त काहीच स्ट्रीट लाईट थोड्याफार सुरू आहेत. परिणामतः यामुळे रस्त्यावरून पायी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना चालताना व रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून जावे लागते. सदर स्ट्रीट लाईट ची ग्रामपंचायत च्या माध्यमातून कधीतरी डागडुजी करण्यात येते खरी परंतु कायमस्वरूपी त्या सुरू राहण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन प्रयत्न करणार का हे पाहणे औचित्यपूर्ण ठरणार आहे. पुणे नगर महामार्गावर लावण्यात आलेल्या स्ट्रीट लाईट अनेक ठिकाणी बंद पडल्या असल्याने रात्रीच्या वेळी याचा सर्वाधिक धोका पायी चालणाऱ्या वाटसरूंना बसत आहेत. या भागातुन अहमदनगर, औरंगाबाद, शिर्डी तसेच अन्य भागात खाजगी ट्रॅव्हल जात असल्याने त्यांचा वेग पाहता एखादा अपघात ज्या भागात स्ट्रीट लाईट बंद आहेत तेथे होण्याची शक्यता आहे. त्यातच दिवाळी सणाच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईट बंद असल्याने अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
स्ट्रीट लाईट पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी गावातील अनेकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला कळवून ही त्यांना फक्त वाटाण्याच्या अक्षता दिल्या जात आहेत. तरी सदर स्ट्रीट लाईट लवकरात लवकर सुरू कराव्यात अशी जोरदार मागणी कोरेगाव भीमातील सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.