
500 रुग्णांसाठीचे अद्ययावत कोवीड केअर सेंटर सुरु : आमदार लहू कानडे
इम्रान शेख श्रीरामपूर
श्रीरामपूर तालुक्यामधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आमदार लहू कानडे यांनी वारंवार प्रशासनाच्या बैठका घेतल्या. मुख्य पदावरील अनेक पदे रिक्त असतानाही प्रभारी अधिका-यांशी संवाद ठेवला. प्रशासकीय यंत्रणेवर साथरोग नियंत्रणाचा ताण वाढलेला असल्याने शक्यतो संवादाची भूमिका ठेऊन प्रशासनाला सतत प्रोत्साहन व धीर दिला. याचाच परिणाम म्हणून मागील वर्षीच्या साथकाळात आमदार लहू कानडे यांनी आमदार निधीतून 30 लाखांपेक्षा अधिक निधी देऊन ग्रामीण रुणालयामध्ये 50 खाटांचे ऑक्सीजन बेड उपलब्ध करुन दिले. त्यामुळे अनेक गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळाले व गरीब जनतेच्या खिशातील कोट्यावधी रुपये वाचले. राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेसचे नेते ना. बाळासाहेब थोरात यांनी काल श्रीरामपूरमध्ये जिल्हाधिकारी यांच्यासमवेत सर्व अधिका-यांची आढावा बैठक घेऊन कोरोना महामारी म्हणजे महायुध्दच आहे, आपणा सर्वांनाच युध्द पातळीवर काम करावयाचे आहे असे आवाहन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील 100 रुग्णांसाठीचे कोवीड सेंटर अपुरे पडत असल्याचे लक्षात येताच आमदारांनी अधिक मोठे कोवीड सेंटर सुरु करण्याच्या प्रशासनाला सुचना केल्या. त्यासाठी 200 बेडसची सुविधा असणारे आदिवासी मुलांचे वसतीगृह आणि अधिक 200 बेडसची सुविधा असणारे आदिवासी मुलींचे वसतीगृह ताब्यात घेण्यात आले. तातडीने तेथे आवश्यक ती साधने उपलब्ध करुन देण्यात आली आणि रुग्ण दाखल करुन घ्यायला सुरुवातही झाली. बघता बघता कालअखेर आदिवासी मुलांच्या वसतीगृहामध्ये 57 रुग्ण दाखल झाले. प्रांताधिकारी अनिल पवार आणि तालुका आरोग्याधिकारी डॉ. मोहन शिंदे यांच्याशी चर्चा करुन या नवीन 400 बेडस उपलब्ध असणा-या कोरोना सेंटरसाठी आवश्यक तेवढे मनुष्यबळही प्रांताधिका-यांनी उपलब्ध करुन दिले. रुग्णांना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून वॉटर फिल्टरची सुविधा सुरु केली आहे. तसेच रुग्णांना सकस आहार मिळावा म्हणून सकाळी नाश्ता व चहा, दुपारी वरणभात व पोळी भाजी व संध्याकाळी पुन्हा वरणभात व पोळी भाजी अशा स्वरुपाचा आहार उपलब्ध करुन देण्याचीही सोय केली आहे. कुठेही फार मोठा गाजा वाजा न करता श्रीरामपूर मध्ये आता 500 रुग्णांसाठी कोवीड केअर सेंटर उभे राहिले आहे. सदरच्या तिनही इमारती शासकीय असून नव्यानेच बांधण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थीसाठींचे बेडस इथे कामी आले आहेत. शिवाय 50 ऑक्सीजन बेडची सुविधा असणारे ग्रामीण रुग्णालय शेजारीच असल्याने या सेंटरमधील रुग्णांला अधिकच्या उपचाराची सुविधा शेजारीच उपलब्ध आहे. या सर्व सुविधा मोफत उपलब्ध असल्याने ज्यांचा रिपोर्ट पॉझीटिव्ह आला आहे, अशा रुग्णांनी पुरेशी जागा नसल्यास घरीच न थांबता या कोवीड सेंटरमध्ये दाखल व्हावे असे आवाहन आमदार लहू कानडे यांनी केले आहे.