युरोपमध्ये कोरोनाचे ७ लाख बळी होणार…

जिनेव्हा – युरोपमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. व्यापक लसीकरणानंतरही कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनाही धक्का बसला आहे.

कोरोनाचे रुग्ण याच वेगाने वाढत राहिले तर पुढच्या काही महिन्यांमध्ये युरोपमध्ये ७ लाख कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होईल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

याबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोपमधील कार्यालयाने सांगितले की, पूर्वानुमानानुसार युरोपमधील ५३ देशांमध्ये येत्या काही महिन्यांमध्ये कोरोनामुळे सात लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या २० लाखांवर पोहोचेल.जागतिक आरोग्य संघटनेचे युरोपमधील कार्यालय डेन्मार्कची राजधानी असलेल्या कोपनहेगनमध्ये आहे. संघटनेने संसर्गापासून संरक्षणासाठीच्या उपायांमध्ये राहत असलेली कमतरता आणि लसीकरणामुळे सौम्य आजार समोर येत असल्याचा हवाला दिला आहे. तसेच कमकुवत इम्युनिटी असलेल्या ६० वर्षांवरील अधिक वयाच्या लोकांना तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांसह सर्वाधिक संवेदनशील लोकसंख्येला कोरोनाच्या लसीचा बुस्टर डोस देण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे सांगितले.

मात्र जिनेव्हामध्ये असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय मुख्यालयाने वर्षाच्या अखेरीस बुस्टर डोसच्या वापराला स्थगिती देण्याचे वारंवार आवाहन केले आहे. हे डोस श्रीमंत देशांच्या तुलनेत कमी लसीकरण झालेल्या अनेक विकसनशील देशांमध्ये लसीकरणासाठी वापरता येतील, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे युरोपमधील विभागीय संचालक डॉ. क्लूजे यांनी सांगितले की, आज संपूर्ण युरोप आणि मध्य आशियामध्ये कोविड-१९ मुळे परिस्थिती खूप गंभीर बनलेली आहे. आता आमच्यासमोर येणाऱ्या हिवाळ्याचे आव्हान आहे. मात्र आपण आशा सोडून चालणार नाही. कारण आम्ही सर्व सरकारे, आरोग्य अधिकारी आणि सर्वसामान्य लोक साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्णायक कारवाई करू शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!