श्रीरामपूर शहरातच होणार कोरोना लसीकरणाची सोय .. आमदार कानडे

श्रीरामपूर तालुका प्रतिनिधी- इम्रान शेख

शासनाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध जारी केल्याच्या पाश्र्वभूमीवर आमदार लहू कानडे यांनी श्रीरामपूर मतदार संघातील कोरोना साथीचा व उपाय योजनांचा आढावा घेतला. शहरापासून ग्रामीण रुग्णालय दूर असल्याने ग्रामीण रुग्णालया सोबतच शहरातील नगरपालिका दवाखान्यांमध्ये ही मोफत लसीकरणची सोय तातडीने सुरू करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. स्वतः जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर बोलून तालुका आरोग्य अधिकारी व ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक यांचा समन्वयही साधून दिला.
ब्रेक द चेन मिशन यशस्वी होण्यासाठी जिथे जिथे निर्बंधाची अंमलबजावणी होणार नाही अशा ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्याच्या सूचना ही आमदारांनी केल्या. कुणाही नागरिकाला मारहाण होणार नाही याची खबरदारी घ्यावी असेही सुचवले.
तर दुकाने सुरू ठेवण्याची अनुमती असणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांना नगरपालिकेने फलक लावून किंवा पत्रकाद्वारे त्यांनी घ्यावयाची काळजी समजून सांगावी. तथापि जे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी. महाविकास आघाडी सरकारने जाणीवपूर्वक संपूर्ण लॉकडाऊन न करता कष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या जनतेला आपली रोजीरोटी कमावता यावी म्हणून भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार, फळ विक्रेते, खाद्यपदार्थांच्या पार्सल सुविधा, दुग्ध व्यवसाय, ऑनलाईन सेवा, न्यायिक कामकाज, दळणवळण अशा असंख्य गोष्टी सुरू राहतील असा निर्णय घेतला आहे. तथापि कोरोना रुग्णांची वाढती संख्या व मृत्यूचे थैमान पाहता रुग्ण वाढीची साखळी तोडणे अत्यावश्यक आहे. यासाठी शनिवार व रविवार चा संपूर्ण लॉकडाऊन व सायंकाळी 8 ते सकाळी 7 ची संपूर्ण संचारबंदी काटेकोरपणे पाळली जाणे आवश्यक आहे. केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही प्रशासनाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून विविध समित्या कार्यान्वित करून तेथेही रुग्ण संख्या वाढणार नाही याची काळजी घ्यावी. आमदार कानडे यांनी अधिकाऱ्यांच्या सभेमध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा करून केवळ श्रीरामपूर नव्हे तर जिल्ह्यातील तालुका स्तरावरील सर्व ग्रामीण आरोग्य केंद्रातून वेंटिलेटरसच्या सुविधेसह गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार मिळाले पाहिजेत अशा स्वरूपाची आग्रही मागणी केली. तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध नसल्यास पेंडामिक कायद्यानुसार प्राप्त झालेल्या अधिकाराने तज्ञांच्या सेवा अधिग्रहित कराव्यात व स्थानिक स्तरावरच व्हेंटिलेटर सह सर्व प्रकारचे उपचार होतील यासाठी दक्षता घ्यावी.
कडक निर्बंध व विकेंड लॉकडाऊन च्या काळामध्ये अन्नधान्याचा तुटवडा भासू नये म्हणून आमदार कानडे यांनी तहसीलदारांकडून अन्नधान्य वितरण व्यवस्थेचाही आढावा घेतला. प्रशासनाने आपल्याच माणसांसाठी आपण काम करीत असल्याच्या भावनेने व संवेदनशीलतेने परिस्थिती हाताळावी. सर्व जनतेचा पाठिंबाही मिळवावा असे आवाहन केले. तसेच काहीही अडचण आल्यास मी सदैव आपल्या सोबत असल्याची ग्वाही दिली.
सदरच्या बैठकीसाठी उपविभागीय अधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर योगेश बंड, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप व इतर आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!